पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली असून जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नंदकिशोर (नंदू) महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यातील विविध मतदारसंघांसाठी एकूण १० उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव विधान परिषद मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये मोठी राजकीय चर्चा सुरू होती. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला होता. मात्र अखेर महायुतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार ही जागा भाजपकडेच कायम राहिली आणि पक्षाने नंदू महाजन यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले.
भाजपने जाहीर केलेल्या यादीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली येथून अरुण लाखाणी, भंडारा-गोंदिया येथून अविनाश ब्राह्मणकर, अमरावती येथून प्रवीण पोटे पाटील, सांगली-सातारा येथून धैर्यशील कदम, सोलापूर येथून राजेंद्र राऊत, अहिल्यानगर येथून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना येथून सुहास शिरसाट, नांदेड येथून अमर राजूरकर, धाराशिव-लातूर-बीड येथून बसवराज पाटील आणि जळगाव येथून नंदकिशोर महाजन यांचा समावेश आहे. तसेच नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारी जाहीर होताच जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. नंदू महाजन हे १ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी महायुतीचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.




