Home » जळगाव » जळगावात 28.61 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

जळगावात 28.61 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत 28 लाख 61 हजार 600 रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि मालवाहू वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशेष पथक तयार करण्यात आले.

दिनांक 9 जून रोजी जळगाव शहरातील अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान महामार्गावरील एका पेट्रोलपंप परिसरात संशयित मालवाहू वाहनाला अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये महाराष्ट्रात विक्री, वाहतूक व साठवणुकीस बंदी असलेला सुगंधित विमल गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पंचनाम्यात वाहनातून 48 गोण्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. या मालाची किंमत 21 लाख 61 हजार 600 रुपये असून, त्यासोबतच महिंद्रा बोलेरो पिकअप मालवाहू वाहन (किंमत 7 लाख रुपये) जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 28 लाख 61 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी वाहनचालक जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि योगेश धुगे करीत आहेत.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *