Home » जळगाव » जळगावचा राजकीय सस्पेन्स संपला! रेश्मा काळे यांची माघार; महाजनांना जाहीर पाठिंबा

जळगावचा राजकीय सस्पेन्स संपला! रेश्मा काळे यांची माघार; महाजनांना जाहीर पाठिंबा

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रेश्मा कुंदन काळे यांनी निवडणुकीतून माघार घेत भाजप व महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे जळगावमधील निवडणुकीचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलल्याचे मानले जात आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपावरून मोठी चर्चा सुरू होती. शिवसेनेकडून विविध नावांची चर्चा होत असताना अखेर ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नसल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विविध बैठका आणि चर्चासत्रे झाली. नाशिक आणि जळगावमधील राजकीय घडामोडींवरही लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रेश्मा काळे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीची एकजूट कायम ठेवण्यासाठी आपण नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले.
तांत्रिकदृष्ट्या त्यांचे नाव निवडणूक रिंगणात कायम असले तरी त्यांनी दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे आता त्यांची राजकीय ताकद महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने उभी राहणार आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचा पेच अखेर संपुष्टात आला असून नंदकिशोर महाजन यांची बाजू अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
आता विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे शरद तायडे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *