Home » जळगाव » मनपा आयुक्त आदित्य जीवने यांची शहरात सरप्राईज भेट; स्वच्छता व विकासकामांची घेतली पाहणी

मनपा आयुक्त आदित्य जीवने यांची शहरात सरप्राईज भेट; स्वच्छता व विकासकामांची घेतली पाहणी

जळगाव : जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने (भा.प्र.से.) यांनी बुधवारी सकाळी शहरातील विविध भागांना अचानक भेट देत स्वच्छता व्यवस्था, विकासकामे आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

दौर्‍यादरम्यान आयुक्तांनी विविध प्रभागांमधील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करत स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी आणि घंटागाडी चालकांशी संवाद साधला. नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे तसेच शहर अभियंता योगेश बोरोले उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक ३ मधील कामांची पाहणी

आयुक्तांनी प्रभाग क्रमांक ३ मधील सुरू असलेल्या ट्रान्सफर स्टेशनच्या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अचूक नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

त्यानंतर सुभाष चौक भाजी मार्केट व सिंधी कॉलनी भाजी मार्केट परिसरातील स्वच्छता, कचरा संकलन आणि व्यवस्थापनाची पाहणी करण्यात आली. तसेच असोदा रोडवरील नाल्याच्या साफसफाईच्या कामाचा आढावा घेत नियमित स्वच्छता आणि रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी

दौर्‍याच्या शेवटी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन कचरा प्रक्रिया, यंत्रसामग्री आणि भविष्यातील नियोजनाबाबत माहिती घेतली. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

आयुक्तांच्या या सरप्राईज भेटीमुळे स्वच्छता आणि विकासकामांमध्ये अधिक गतिमानता येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *