जळगाव : शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त आदित्य जिवने (भा. प्र. से.) यांनी शनिवारी दुचाकीवरून शहरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाची तपासणी करत स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटींचा आढावा घेतला.
टीबी सॅनिटोरियम येथील बीव्हीजी कंपनीच्या वाहनतळापासून पाहणीची सुरुवात करण्यात आली. वाहनांची स्थिती, कचरा संकलन केंद्राची व्यवस्था आणि स्वच्छतेसंदर्भातील कामकाजाची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आदर्श नगर, इच्छादेवी परिसर, डी-मार्ट, गणेश कॉलनी, एम. जे. कॉलेज परिसर, सुभाष चौक, भिलपुरा चौक आणि नेरी नाका आदी भागांत दुचाकीवरून प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेची तपासणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान भजे गल्ली परिसरात दुकानाबाहेर कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच शहरातील १९ प्रभागांतील आरोग्य निरीक्षक आणि बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची परेड घेऊन स्वच्छता कामे अधिक प्रभावीपणे व नियमितपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आयुक्त आदित्य जिवने यांनी आरोग्य विभागाने नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवून जबाबदारीने काम करावे, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला.
Author: K P Chavan
thepubliclive


