Home » जळगाव » १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी अटकेत!

१६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी अटकेत!

जळगाव | प्रतिनिधी : बनावट शालार्थ आदेशांच्या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात जळगाव जिल्हा परिषदेचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथून त्यांना ताब्यात घेऊन नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सन २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे कोणतेही अधिकृत प्रस्ताव प्राप्त नसतानाही कथितरित्या बनावट मान्यता देण्यात आल्याचा आरोप आहे. या मान्यतांच्या आधारे शालार्थ प्रणालीमध्ये नोंदी करून वेतन व इतर आर्थिक लाभ उचलण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

बनावट शालार्थ आयडी प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे शशिकांत हिंगोणेकर धुळे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून त्यांना अटक केली.

प्राथमिक तपासानुसार, नाशिक उपसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने कोणत्याही अधिकृत वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ प्रस्तावांशिवाय मागील तारखेचे आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या कथित गैरव्यवहारातून शासनाची सुमारे ₹१६० कोटींची फसवणूक झाल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक तसेच इतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपासात आतापर्यंत सुमारे १२०० जणांचा सहभाग संशयाच्या भोवऱ्यात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *