Home » जळगाव » मन्यारखेडा मासे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; १६ उद्योजकांची निष्पक्ष चौकशीची मागणी

मन्यारखेडा मासे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; १६ उद्योजकांची निष्पक्ष चौकशीची मागणी

जळगाव | प्रतिनिधी : मन्यारखेडा येथील तलावातील मासे मृत्यू प्रकरणात प्रशासनाकडून उद्योगांवर एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप करत परिसरातील उद्योजकांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत निष्पक्ष व वैज्ञानिक चौकशीची मागणी केली. कोणत्याही ठोस निष्कर्षापूर्वी उद्योगांना जबाबदार धरणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

मत्स्य उत्पादकाच्या तक्रारीनंतर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून सुनावणीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने उद्योजक आणि उद्योगांवर अवलंबून असलेल्या शेकडो कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार सर्व उद्योगांनी स्वखर्चाने ईटीपी (ETP) उभारून प्रदूषण नियंत्रणाचे निकष पाळल्याचा दावा उद्योजकांनी केला.

उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, मन्यारखेडा तलावात केवळ औद्योगिक सांडपाणीच नव्हे, तर आसपासच्या गावांतील सांडपाणी तसेच शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे पाणीही मिसळते. त्यामुळे माशांच्या मृत्यूचे नेमके कारण तज्ज्ञांकडून वैज्ञानिक पद्धतीने तपासले जावे, अशी त्यांची मागणी आहे.

याशिवाय, काही उद्योग बंद असून काही उद्योजकांनी कारखाने विकल्याचा दावा केला. तरीही त्यांना या प्रकरणात नोटिसा बजावण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. वर्षभर उद्योग सुरू असताना मासे केवळ ठराविक कालावधीतच का दगावतात, याचाही तपास व्हावा, असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला निवेदन देत उद्योजकांनी निष्पक्ष चौकशी, एकतर्फी कारवाई थांबविणे, खोट्या तक्रारींची चौकशी आणि उद्योगांवर अवलंबून असलेल्या शेकडो कामगारांच्या रोजगाराचे संरक्षण करण्याची मागणी केली.

पत्रकार परिषदेला रवींद्र फालक, संतोष इंगळे, मधुकर महाजन, दत्तू मराठे, रमेश सोनार, कैलास पाटील, सतीलाल पाटील, संदीप वाघ, प्रदीप कोल्हे, संतोष कोळी, कैलास सोनवणे, समाद शेख, अखिलेश उपाध्याय, आलम शेख, साहेबराव पाटील, विजय चव्हाण, साबीर शेख, जुनेद शेख, जितेंद्र पाटील आणि दिनेश महाजन यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *