भंडार : वृत्तसंस्था
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर महायुती सरकारच्या विरोधकांनी हल्लाबोल केला होता तर आता भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परतीच्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करताना पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीवजा इशारा दिला आहे.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संतापले असून, त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारने आपल्या धोरणांमध्ये बदल करावा, अशी मागणी पडोळे यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहनही पडोळे यांनी सरकारला केले.
प्रशांत पडोळे म्हणाले, “शेतकऱ्यांना पीक विम्याचे फक्त 18 रुपये भेटले साहेब, 18 रुपयांनी काय होते? धोरणं बदलाना साहेब. धोरणं बदलाना आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये दिले नाही. तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये दिले नाही आणि त्यांचा हक्क दिला नाही, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही, यावेळेस आम्ही तुम्हाला उडवून देऊ साहेब.” अशी धमकीच खासदार प्रशांत पडोळे यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.



