जळगाव : प्रतिनिधी
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतुक करणारे वाहनावर रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. त्या वाहनातून सुमारे ३० लाख २० हजार रुपयांचा गुटख्यासह वाहन चालक किरण भास्कर नांदरे (वय ४३, रा. सेन्ट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीतील एकमुखी दत्त मंदिर परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास (एमएच १९, सीएक्स ६६३४) क्रमांकाचे मालवाहू वाहन संशयास्पदरित्या उभे असल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ कालसिंग बारेला, प्रवीण जगदाळे व विनोद सुर्यवंशी हे दाखल झाले. संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या वाहनातून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतुक केली जात असल्याचे कळताच त्यांनी लागलीच अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार हे अमोल जगताप, आकाश बोऱ्हाडे, योगराज सुर्यवंशी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासमोर संशयास्पदरित्या उभे असलेले वाहनाची तपासणी केली. यावेळी त्यांना वाहनात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचे पोते आणि बॉक्स असा एकूण सुमारे २४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आला. पोलिसांनी गुटख्याचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर त्याची वाहतुक करणाऱ्याला देखील ताब्यात घेतले. प्रतिबंधित असलेला गुटख्याचा चोरटी वाहतुक थांबविण्यासाठी त्याची कसून चौकशी करुन पुरवठा करण्याचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी पंचनामा करुन ते वाहन रामानंद नगर पोलिस ठाण्यात आणले. त्याठिकाणी पोलिसांनी प्रतिबंधित असलेला गुटख्यासह वाहन जप्त केले. याप्रकरणी गुटख्याची वाहतुक करणाऱ्या वाहन चालक किरण भास्कर नांदरे (रा. सेंट्रल बँक कॉलनी, एकमुखी दत्त मंदिराजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे



