Home » राष्ट्रीय » अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक : एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचे नाव समाविष्ट करा !

अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक : एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचे नाव समाविष्ट करा !

मुंबई : वृत्तसंस्था 

पुणे येथील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. या घोटाळ्याचा प्राथमिक तपास अहवाल तात्काळ समोर आला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे. “एफआयआरमध्ये अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांचे नाव समाविष्ट झालेच पाहिजे. एकदा का पार्थ यांचे नाव गुन्ह्यात आले की अजित पवार यांना राजीनामा द्यावाच लागेल आणि त्यासाठीच माझा लढा सुरू आहे,” असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.

अंजली दमानिया यांनी केवळ सत्ताधाऱ्यांवरच नव्हे, तर विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही बोट ठेवले आहे. पार्थ पवार यांच्या एफआयआरसाठी विरोधी पक्षांनीही आक्रमक मागणी करणे गरजेचे होते. काँग्रेस हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे समजते, मात्र इतर विरोधी पक्ष काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू असतानाच दिग्विजय पाटील यांना जय पवार यांच्या लग्नासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यावर दमानिया यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “चौकशीला पुन्हा हजर राहण्याची ग्वाही सगळेच देतात. पण एकदा देश सोडून पळून गेल्यावर परत किती जण येतात? दिग्विजय पाटील परत आले तर ठीक, पण नाही आले तर काय? आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय. त्यातील एक माणूस दाखवा, जो परत आलाय,” असे दमानिया म्हणाल्या.

दिग्विजय पाटील हे स्वत:हून गेलेत की त्यांना जाणीवपूर्वक जाऊ दिले हे कळत नाहीये. मामेभाऊ म्हटल्यावर आतेभावाच्या लग्नाला गेले असतील, हे आम्ही समजू शकतो. पण आताच्या घडीला त्यांना रोखणे गरजेचे होते. कारण त्यांच्यावर असलेल्या एफआयआरमध्ये ७ ते १४ वर्षांची शिक्षा असताना, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना बाहेर देशात जाऊ दिले नाही पाहिजे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांना पाटील यांना परदेशात जाऊ दिले त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

यावेळी बोलताना दमानिया म्हणाल्या की, मी आजच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. जमीन खरेदी करणारी ‘अमेडिया’ ही कंपनी असून त्यात पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी आहे. असे असताना एफआयआरमध्ये केवळ 1 टक्का भागीदारी असलेल्या आणि फक्त सहीचे अधिकार असलेल्या व्यक्तीचे नाव टाकून काय उपयोग? मुख्य भागीदाराचे नाव गुन्ह्यात आलेच पाहिजे, अशी मागणी त्या फडणवीसांकडे करणार आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *