छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील उपेक्षित आणि मुख्य गावांपासून दूर असलेल्या सर्व तांड्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयामुळे तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचे अस्तित्व मिळून १५व्या वित्त आयोगाचा निधी थेट उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धाराशिव जिल्ह्यातील ईट, येणेगूर, आपसिंगा आणि ढोकी येथील प्रचारसभांमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की, मुख्य गावांपासून लांब असलेले तांडे आजपर्यंत अनेक मूलभूत सुविधा आणि विकासापासून वंचित राहिले आहेत. स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्यानंतर तांड्यांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करता येईल. यामुळे सामाजिक न्याय, आत्मसन्मान वाढेलच, शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थलांतर कमी होईल.
केंद्र व राज्य सरकारच्या १२४ लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना बावनकुळे यांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची संधी आहे. सौर ऊर्जेद्वारे १२ तास वीज पुरवठा, ‘बळीराजा पाणंद रस्ते’ योजना, तसेच कर्जमाफीचा लाभ आपल्या सरकारमुळे मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘लाडकी बहीण योजना’ निरंतर सुरू राहणार असून महिला बचत गटांना ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतल्याचे सांगितले. या सर्व योजना प्रभावीपणे गावागावात पोहोचवण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.



