जळगाव : प्रतिनिधी
दिनांक ०८/०२/२०२६ रोजी आनंद मोर्या, रा. अयोध्या, झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान त्यांची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. या बॅगेत १,६५,०००/- रुपये किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने होते. सदर प्रकरणाची तक्रार आनंद मोर्यांनी इटारसी रेल्वे पोलीसात दाखल केली होती, जी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली. तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तपास सुरू केला.

तपासात जळगाव येथील रेकॉर्डवरील आरोपी समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (रा. फातेमा नगर, अल्फरा मशीद जवळ, वय २१) आणि त्याचा साथीदार सोनु जयसिंग बागडे (रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव) या दोघांनी हा गुन्हा केले असल्याचे खात्रीस आले. गुप्तबातमीदाराच्या साह्याने समीर शेख याला फातेमा नगर, जळगाव येथून ताब्यात घेतले गेले. तपासात त्याने हा गुन्हा आपल्या साथीदारासह केला असल्याची कबुली दिली. साथीदाराचा शोध सध्या सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांनी सहभाग घेतला. पोलीसांनी सांगितले की, हा प्रकार रेल्वे मार्गातील मोठ्या चोरीच्या प्रकरणाची दखल घेण्यासारखा आहे आणि पुढील तपासात आरोपीचा साथीदार लवकरच ताब्यात येईल.


