जळगाव, दि. १८ प्रतिनिधी – जळगावकरांच्या क्रिकेटप्रेमाला आजपासून खरी उधाण आले आहे. जळगाव क्रिकेट लिग २०२६ चा बहुप्रतिक्षित महा-थरार आज दि. १८ एप्रिलपासून मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर सुरू झाला. उद्घाटन सोहळा जल्लोषात पार पडताच मैदानावर दमदार सामन्यांना सुरुवात झाली असून प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
उद्घाटनप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाचोरा आमदार किशोर पाटील, चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण, रावेर आमदार अमोल जावळे, अमळनेर आमदार अनिल भाईदास पाटील, जळगाव शहर आमदार सुरेश भोळे, चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह अशोक जैन, अतुल जैन यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, जेसीएल व्यवस्थापन, पंच, संघ मालक, प्रशिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहा संघ, १०८ खेळाडू – क्रिकेटचा महाकुंभ
या स्पर्धेत एकूण ६ संघ, ६ प्रशिक्षक आणि तब्बल १०८ खेळाडू सहभागी झाले असून प्रत्येक संघाने दमदार संघरचना केली आहे.
जळगाव कोगटा किंग
जामनेर सातपुडा हिरोज
पाचोरा एसकेटी योद्धाज
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स
रावेर रॉयल्स
अमळनेर सुहांस जायंट्स
आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेत गुणलेखनासाठी मोहम्मद फजल, साद शेख, तौकिर रजा, मनिष चौबे हे काम पाहणार आहेत.
जैन ड्रीम स्पेसेस मैदान सज्ज
कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसचे मैदान अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. ट्रफ विकेट, हिरवळीचे लॉन, एलईडी लाईट्स, बाऊंडरीवर मोठ्या स्क्रीन आणि प्रेक्षकांसाठी खास गॅलरीमुळे मुंबई-पुण्यासारखा स्टेडियम अनुभव जळगावमध्येच उपलब्ध झाला आहे. दिवस-रात्र सामने खेळवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
लीग स्वरूप आणि सामने
१८ ते २६ एप्रिल दरम्यान एकूण १९ सामने खेळवले जाणार आहेत. लीग फेरीत प्रत्येक संघ पाच सामने खेळेल. त्यानंतर क्वालिफायर, एलिमिनेटर आणि ग्रँड फायनल सामने होणार आहेत.
आजचे सामने (दि. १८ एप्रिल):
सकाळी ८:३० – जामनेर सातपुडा हिरोज 🆚 पाचोरा एसकेटी योद्धाज
सायंकाळी ७:३० – चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स 🆚 जळगाव कोगटा किंग
क्रिकेटचा जल्लोष सुरू
चौकार-षटकार, यॉर्कर, बाऊन्सर आणि गुगलींच्या थराराने पुढील ९ दिवस जळगावमध्ये क्रिकेटचा उत्सव रंगणार आहे. स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जळगाव क्रिकेट लिग २०२६ मुळे जिल्ह्यातील क्रिकेटला नवी दिशा मिळणार असून आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेमुळे जळगाव शहरात क्रीडा संस्कृतीचा नवा उत्सव पाहायला मिळत आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


