जळगाव (प्रतिनिधी): पत्रकारांविषयी खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवत खासदारांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी तसेच योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, २५ जून रोजी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे पत्रकारांचा सन्मान दुखावला गेला असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाही मूल्यांवर आघात झाल्याची भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.


संघटनेने म्हटले आहे की, पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते प्रामाणिकपणे करतात. अशा परिस्थितीत जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांबाबत अवमानकारक भाषा वापरणे हे दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे संघटनेने नमूद केले.
निवेदनाद्वारे प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, संबंधित खासदारांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी आणि भविष्यात पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक सचिव भगवान सोनार, संस्थापक खजिनदार ललित खरे, जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल यांच्यासह मनिष जोग, नरेंद्र पाटील, किशोर पाटील, योगेश सुने, पवन खंबायत, योगेश चौधरी, धर्मेंद्र राजपूत, संदीप वानखेडे, निखिल वाणी, विकास पात्रे, नाजनिन शेख, कल्पेश हिरवळकर, जगमोहनसिंग ठाकूर तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ व तरुण पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: K P Chavan
thepubliclive


