पब्लिक लाईव्ह न्यूज | प्रतिनिधी जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क चौफुली येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात घडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुली परिसरातून जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तो थेट ट्रकच्या चाकाखाली सापडला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.
दरम्यान, भररस्त्यात अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




