पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव शहर महानगरपालिकेची तब्बल ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून मुंबईस्थित मे. अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड तसेच त्यांच्या संचालकांसह संबंधितांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मनपाच्या कारभारावर आणि ठेकेदारी व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुन्हा नोंद; गंभीर कलमे लागू

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १२७/२०२६ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय दंड विधानातील कलम ४०६ (विश्वासघात), ४०९ (विश्वासाने दिलेल्या मालमत्तेचा अपहार) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हा गुन्हा दि. १ मे रोजी रात्री ९.१० वाजता दाखल करण्यात आला.
या प्रकरणी जळगाव महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता योगेश प्रकाश बोरोले (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्यात कंपनीचे संचालक राझू अंबालाल वावरोट (रा. अंधेरी, मुंबई) यांच्यासह इतर संबंधितांना आरोपी करण्यात आले आहे.
नेमका प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च १९९७ ते १ एप्रिल २००६ या कालावधीत तत्कालीन जळगाव नगरपरिषदेकडून शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निविदा काढण्यात आली होती. संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीने पेव्हर मशीनच्या सहाय्याने काम करण्याचे मान्य केले होते.
मात्र, करारानुसार काम पूर्ण न करता तसेच मुदतीचे उल्लंघन करून कंपनीने नगरपरिषदेचा विश्वास संपादन करत संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात Mobilisation Fund (मूळ रक्कम), त्यावरील व्याज, दंड तसेच पालिकेला झालेला अतिरिक्त खर्च यांचा समावेश करून एकूण ४२.६० कोटी रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तपास EOW कडे वर्ग
या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाचा तपास Economic Offences Wing (EOW), जळगाव कडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी केली जात आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
दीर्घ कालावधीनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे केवळ ठेकेदार कंपनीच नव्हे, तर त्या काळातील प्रशासकीय देखरेख, करार प्रक्रिया आणि निधी वापर यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक निधीचा इतक्या मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा आरोप गंभीर मानला जात असून, पुढील काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


