पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव शहराच्या औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) ‘जे’ सेक्टरमध्ये शनिवारी दुपारी भीषण आगीची घटना घडली. भारत गॅस गोदामासमोर असलेल्या ‘जे ब्रदर्स’ आणि ‘श्री एंटरप्रायझेस’ या दोन कंपन्यांना अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, संपूर्ण शहरातून धुराचे प्रचंड लोट दिसत होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. ‘जे ब्रदर्स’ या कंपनीत खोबरेल तेल व विविध सुगंधी तेलांचे पॅकिंग केले जात होते, तर शेजारील ‘श्री एंटरप्रायझेस’मध्ये प्लास्टिकच्या चटया तयार केल्या जात होत्या. दोन्ही ठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण केले.
स्फोटांच्या आवाजांनी परिसर हादरला

आग लागल्यानंतर कंपन्यांमधून सतत स्फोटांचे मोठे आवाज येत होते. तेलाचे डबे आणि रसायनांनी भरलेली पिंपे यामुळे हे स्फोट होत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्फोटांमुळे परिसरात भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
युद्धपातळीवर मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असून आतापर्यंत अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी वापरण्यात आले आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेता, समोरच असलेल्या भारत गॅस गोदामातूनही पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
कोट्यवधींच्या नुकसानीची भीती
या भीषण आगीत दोन्ही कंपन्यांतील कच्चा माल, यंत्रसामग्री आणि तयार साठा पूर्णपणे जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
कारण अद्याप अस्पष्ट
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, वाढलेली उष्णता किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


